सेंट जाॅर्जेस रूग्णालय हे सध्या कोविड-19 क्रिटीकल हाॅस्पिटल म्हणून रूग्णसेवा प्रदान करीत आहे. कोविड रूग्णांच्या मनातील कोविड-19 या संसंर्गजन्य आजाराविषयीची भिती घालवण्यासाठी, त्यांचा एकटेपणा घालवून त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी तसेच या आजाराबाबत त्यांच्या मनात काही व्यक्तिगत स्वरूपातील काही प्रश्न, अडी अडचणी असतील तर त्या सोडविण्यासाठी अशा पद्धतीच्या समुपदेशनाचे सत्र तज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे नियमितपणे चालवले जात आहे.
सदर संकल्पना ही वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने सर यांच्या संकल्पनेतून साकारली गेली आहे. डाॅ. लहाने सर यांच्या मार्गदर्शनाखाली व ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई येथील मानसोपचार विभागाचे विभाग प्रमुख डाॅ. काळे सर यांच्या अध्यक्षतेखाली या संदर्भात एक समिती गठीत करून अशा पद्धतीच्या समुपदेशन उपक्रमाचा रितसर आराखडा तयार करण्यात आला आहे. त्या नुसार सेंट जाॅर्जेस रूग्णालय मुंबई येथे देखील तज्ञ डाॅक्टरांच्या मदतीने दैनिक स्तरांवर नियमितपणे अशा पद्धतीच्या समुपदेशनाचे सत्र चालवले जात आहे. याचा फायदा रूग्णांचे मनोबल वाढविण्या करिता निश्चितच होताना दिसत आहे. तसेच रूग्ण बरा होवून घरी गेल्या नंतर देखील त्याला सामान्य जीवन कसे जगता येईल याबाबत देखील या सत्रात तज्ञांद्वारे मार्गदर्शन केले जात आहे. याबाबत रूग्णांकडूनही चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशी माहिती रुग्णालयाचे अधीक्षक डाॅ. आकाश खोब्रागडे सर यांनी दिली आहे.

