जे. जे. ग्रूप ऑफ हाॅस्पिटल च्या डाॅक्टरांचा “विषाणू रक्षक” या अत्याधुनिक विषाणू प्रतिबंधात्मक रूग्ण पेटीचा नवा अविष्कार …

जे. जे. ग्रूप ऑफ हाॅस्पिटल च्या डाॅक्टरांचा “विषाणू रक्षक” या अत्याधुनिक विषाणू प्रतिबंधात्मक रूग्ण पेटीचा नवा अविष्कार …
सेंट जॉर्जेस रुग्णालयात प्रात्यक्षिक व उदघाटन समारंभ …

जे. जे. ग्रूप ऑफ हाॅस्पिटलच्या डाॅक्टर्सनी अविष्कारीत केलेल्या “विषाणू रक्षक” या नवीन वैद्यकीय उपकरणाचा शुभारंभ कार्यक्रम
आज दिनांक ०५/०३/२०२१ रोजी सेंट जॉर्जेस रुग्णालय, मुंबई येथे वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय महाराष्ट्र राज्याचे संचालक पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने सर याच्या हस्ते व जे. जे. रूग्णालयाचे अधिष्ठाता डाॅ. रणजीत माणकेश्वर, शल्य चिकित्सक डाॅ. भंडारवार सर, सेंट जॉर्जेस रूग्णालयाचे अधीक्षक डाॅ.आकाश खोब्रागडे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

डिपार्टमेंट ऑफ जनरल सर्जरीचे डाॅ.भंडारवार सर व त्यांचे सहकारी यांना संचालक साहेब, अधिष्ठाता, विशेषज्ञ यांच्या मार्गदर्शक सहकार्यातून व मेडीमेक या कंपनीच्या माध्यमातून “विषाणू रक्षक” ही संकल्पना यशस्वीरित्या प्रत्यक्षात साकारता येवू शकली आहे. या “विषाणू रक्षक” चेंबरचे वैशिष्ट्य म्हणजे महाभयानक संसर्गजन्य आजाराने बाधीत रूग्णांवर करण्यात येणारी उपचार पध्दती, शल्य चिकित्सा तसेच अशा रूग्णांची विषाणू प्रतिबंधित पध्दतीने वाहतूक करण्यासाठी “विषाणू रक्षक” हे वैद्यकीय उकरण अतिशय महत्वपूर्ण भूमिका बजावू शकणार आहे यात शंका नाही. कोरोना, इबोला, क्षयरोग या सारख्या संसर्गजन्य आजाराने ग्रस्त असणा-या रूग्णांकडून संक्रमित होणारे विषारी विषाणू हवेत पसरून डाॅक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, इतर रूग्ण अथवा सामान्य नागरीक यांच्या पर्यंत पोहचून त्यांच्या जीवाला अथवा आरोग्याला निर्माण होणारा धोका या विषाणू प्रतिबंधात्मक रूग्ण पेटीमुळे निश्चितपणे टाळण्यास मदत होणार आहे.

सध्याच्या कोरोनाच्या या आव्हानात्मक काळात अशा पध्दतीचे विषाणू प्रतिबंधात्मक उपकरण जास्तीत जास्त उपयुक्त ठरेल असा विश्वास व्यक्त करून संचालक पद्मश्री डाॅ. तात्याराव लहाने सरांनी सर्व डाॅक्टर्स व तंत्रज्ञ यांचे अभिनंदन करून कौतूक केले आहे.

– सेंट जाॅर्जेस रूग्णालय,फोर्ट, मुंबई – ०१