महाराष्ट्र शासनाने सेंट जाॅर्जेस रूग्णालयास ‘कोरोना क्रिटीकल केअर हाॅस्पिटल’ म्हणून घोषित केले आहे अगदी तेंव्हा पासूनच सेंट जाॅर्जेस रूग्णालय हे आपले सर्वोत्कृष्ट योगदान देण्यासाठी युध्द पातळीवर प्रयत्नशील राहिलेले आहे. कोरोना च्या या आव्हानात्मक कालावधीत सेंट जाॅर्जेस रूग्णालय ‘कोरोना क्रिटीकल केअर हाॅस्पिटल’ चे अधीक्षक म्हणून जेंव्हा डाॅ. आकाश खोब्रागडे यांनी ‘अधीक्षक’ पदाचा पदभार स्वीकारला अगदी तेंव्हा पासून ते देखील एकही सुट्टी न घेता अविरतपणे, अहोरात्र या कार्यात सक्रिय व प्रत्यक्षरित्या आपले योगदान देत आहेत. अर्थातच अधीक्षक म्हणून स्विकारलेली जबाबदारी व त्या अनुषंगाने त्यांनी आपल्या कामाच्या पध्दतीतून दाखवून दिलेला प्रेरक मार्ग या बाबींचा रूग्णालयातील संपूर्ण कर्मचारी, संपूर्ण वैद्यकीय स्टाफ व एकूणच रूग्णालयीन कामकाज व व्यवस्थापन या वरती निश्चितच सकारात्मक प्रभाव पडलेला आहे. आणि म्हणूनच आज सेंट जाॅर्जेस रूग्णालयाचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.
सुरूवातीला रूग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार करण्यासाठी केवळ 10 आय.सि.यु. बेड व 20 नियमित बेड उपलब्ध होते. त्यात सुधारणा व वाढ होवून आता 100 आय.सि.यु. बेड व 220 नियमित बेड या पध्दतीची क्षमता वाढवण्यात आलेली आहे. अर्थातच या संपूर्ण कार्यात, रुग्णालयीन कामकाजात, रूग्णसेवेतील योगदानात अमुलाग्र असे सकारात्मक बदल घडून येत आहेत त्यात सर्वांचाच सहभाग आहे. महाराष्ट्र राज्य शासन, वैद्यकीय शिक्षण व संशोधन मंत्रालय, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मा. संचालक साहेब, अधिष्ठाता, संपूर्ण डाॅक्टर्स, नर्सेस, अधिकारी, कर्मचारी, तंत्रज्ञ, सफाई कामगार, विविध समाज सेवी संघटना, समाज सेवा विभाग कर्मचारी व सर्व सहकारी या सर्वांच्या अथक प्रयत्नातून व योगदानातून आपण सर्व कोरोना ची ही लढाई लढण्यासाठी सक्षम होत आहोत, असे मत अधीक्षक डाॅ. आकाश खोब्रागडे यांनी व्यक्त केले आहे.